मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले :
“अग्रिप्पा राजे, यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात, आणि यहूदी ज्यांविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करायचे आहे, ह्यावरून मी स्वतःला धन्य समजतो; आणि मी आपल्याला विनंती करतो की, शांतपणे माझे भाषण ऐकून घ्यावे.
तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकांत व यरुशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहूद्यांना माहीत आहे.
ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परूशी होतो.
आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे;
ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.
देव मेलेल्यांना उठवतो हे तुमच्यापैकी कित्येकांना अविश्वसनीय का वाटावे?
मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात;
आणि तसे मी यरुशलेमेत केलेही; मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले; आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली.
प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करायला लावण्याचा प्रयत्न मी करत असे; त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरांपर्यंतदेखील मी त्यांचा पाठलाग करत असे.
हे चालू असता, मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्काकडे चाललो होतो.
तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.
तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण.’
मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.
तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.
ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’
म्हणून, अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टान्त अवमानला नाही;
तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.
ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारायला पाहत होते.
तथापि देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांस साक्ष देत राहिलो आहे; आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही.
त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसणारे व्हावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणार्यांपैकी पहिले होऊन आमच्या लोकांना व परराष्ट्रीयांनाही प्रकाश प्रकट करावा.”