प्रेषितांनी व यहूदीया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, “सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवलात.” तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली : “मी यापो नगरात प्रार्थना करत होतो; तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले, व ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहत होतो तेव्हा पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली. आणि मी अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’ परंतु मी म्हणालो, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसर्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, ‘देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.’ असे तीनदा झाले; नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली. इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरीयातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, ‘काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा.’ मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले की, ‘मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण; ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल.’ मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की, ‘योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला हे खरे; परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.’ जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले; तर मग देवाला अडवणारा असा मी कोण?” हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”
प्रेषितांची कृत्ये 11 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 11:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ