YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 1:12-26

प्रेषितांची कृत्ये 1:12-26 MARVBSI

मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले. आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले; तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते. हे सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना व विनंती करण्यात तत्पर असत. त्या दिवसांत पेत्र बंधुवर्गामध्ये (सुमारे एकशेवीस माणसांच्या जमावामध्ये) उभा राहून म्हणाला, “बंधुजनहो, येशूला धरून नेणार्‍यांना वाट दाखवणार्‍या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य वर्तवले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. त्याची आपल्यामध्ये गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता. (त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. हे यरुशलेमेत राहणार्‍या सर्वांना कळले; म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.) स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे, ‘त्याचे घर उजाड पडो, व त्यात कोणीही न राहो;’ आणि ‘त्याचा हुद्दा दुसरा घेवो.’ म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपल्यामध्ये येत-जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.” तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सब्बा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू, हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.” मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.

प्रेषितांची कृत्ये 1:12-26 साठी चलचित्र