YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 24:4-15

२ शमुवेल 24:4-15 MARVBSI

तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार ह्यांचे काही चालेना, आणि यवाब व सैन्यांचे सरदार राजापुढून इस्राएल लोकांची मोजदाद करण्यासाठी निघून गेले. त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्‍याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले. मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले. नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले. ते देशभर चहूकडे फिरून नऊ महिने वीस दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले. तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले. प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे; तर हे परमेश्वरा, आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.” दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो, त्यांपैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग.” तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला हे सांगितले; त्याने त्याला विचारले, “तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असताना तू त्यांच्यापुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात तीन दिवस मरी यावी? ह्याचा चांगला विचार कर; ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ ते पाहा.” दावीद गादास म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; परमेश्वराच्या हाती आपण पडू या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.” मग परमेश्वराने इस्राएलात सकाळपासून नेमलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली; आणि दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या लोकांपैकी सत्तर हजार लोक मेले.