YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 पेत्र 1:12-21

2 पेत्र 1:12-21 MARVBSI

ह्या कारणास्तव जरी तुम्हांला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हांला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात तरी तुम्हांला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन. मी ह्या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला उचित वाटते; कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे; आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.