YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 15:8-22

२ राजे 15:8-22 MARVBSI

यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या कारकिर्दीच्या अडतिसाव्या वर्षी जखर्‍या बिन यराबाम इस्राएलावर शोमरोनात राज्य करू लागला; त्याने सहा महिने राज्य केले. त्याने आपल्या वाडवडिलांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने सोडून दिली नाहीत. याबेशाचा पुत्र शल्लूम ह्याने त्याच्याशी फितुरी करून व त्याला लोकांदेखत मार देऊन वधले, आणि त्याच्या जागी तो राजा झाला. जखर्‍याची बाकीची कृत्ये इस्राएलाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत ती पाहा. परमेश्वराने येहूस सांगितले होते की, “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलाच्या गादीवर बसतील.” त्याप्रमाणे घडून आले. यहूदाचा राजा उज्जीया1 ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी शल्लूम बिन याबेश हा राज्य करू लागला; त्याने शोमरोनात एक महिना राज्य केले. मनहेम बिन गादी हा तिरसा येथून शोमरोनास गेला आणि तेथे त्याने शल्लूम बिन याबेश ह्याला मार देऊन वधले आणि त्याच्या जागी तो राजा झाला. शल्लूमाची बाकीची कृत्ये व त्याने केलेले बंड ह्या सर्वांचे इस्राएलाच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे ते पाहा. मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणार्‍या लोकांना मार दिला; त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यांना हा मार दिला; त्याने तेथल्या गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या. यहूदाचा राजा अजर्‍या ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी मनहेम बिन गादी इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने दहा वर्षे शोमरोनात राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली ती त्याने आमरण सोडली नाहीत. अश्शूरचा राजा पूल ह्याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने मदत करून गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्याला एक हजार किक्कार2 चांदी दिली. अश्शूराच्या राजाला देण्यासाठी मनहेमाने इस्राएलातल्या मोठमोठ्या धनवान लोकांकडून प्रत्येकी पन्नास शेकेल चांदी काढली. मग अश्शूरचा राजा परत गेला, देशात थांबला नाही. मनहेमाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? मनहेम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; आणि त्याचा पुत्र पकह्या हा त्याच्या जागी राजा झाला.