YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 14:15-27

२ राजे 14:15-27 MARVBSI

यहोआशाने केलेली बाकीची कृत्ये, त्याचा पराक्रम, तो यहूदाचा राजा अमस्या ह्याच्याशी कसा लढला ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला शोमरोनात इस्राएलाच्या राजांमध्ये मूठमाती देण्यात आली; त्याचा पुत्र यराबाम हा त्याच्या जागी राजा झाला. इस्राएलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज ह्याच्या मृत्यूनंतर यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश हा पंधरा वर्षे जगला. अमस्याची बाकीची कृत्ये यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत, नाहीत काय? यरुशलेमेत त्याच्याविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला; पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले; त्याला घोड्यांवर घालून आणले आणि यरुशलेमेत दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली. मग सर्व यहूदी लोकांनी सोळा वर्षांच्या अजर्‍यास1 त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले. अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर अजर्‍याने एलाथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले. यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा यराबाम बिन योवाश शोमरोनात राज्य करू लागला; त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; नबाटपुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून जी पापकर्मे करवली त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडून दिली नाहीत. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने गथ-हेफेर येथील आपला सेवक योना बिन अमित्तय ह्या संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते त्याप्रमाणे यराबामाने हमाथाच्या घाटापासून अराबाच्या समुद्रापर्यंत इस्राएलाचा गेलेला मुलूख परत घेतला. इस्राएलास दुःसह क्लेश होत आहेत असे परमेश्वराने पाहिले; बंदिवासात किंवा मोकळा असा कोणीही उरला नव्हता; इस्राएलाचा साहाय्यकारी असा कोणीच राहिला नव्हता. ह्या नभोमंडळाखालून इस्राएलाची नावनिशाणी मी नाहीशी करीन असे परमेश्वर म्हणाला नव्हता, म्हणून त्याने योवाशाचा पुत्र यराबाम ह्याच्या द्वारे त्यांची सोडवणूक केली.