YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 13:14-25

२ राजे 13:14-25 MARVBSI

ज्या दुखण्याने अलीशा मरणार होता ते त्याला आता लागले; तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्याच्याकडे गेला. तो ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, “बाबा! अहो बाबा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!” अलीशाने त्याला सांगितले, “धनुष्यबाण घेऊन ये.” तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याच्याकडे आला. त्याने इस्राएलाच्या राजाला सांगितले, “धनुष्याला आपला हात लाव.” त्याने आपला हात धनुष्याला लावला; तेव्हा अलीशाने आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. मग त्याने सांगितले, “पूर्वेकडील खिडकी उघड.” त्याने ती उघडली. मग अलीशा त्याला म्हणाला, “बाण सोड.” तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, “हा बाण परमेश्वराकडून होणार्‍या सोडवणुकीचे म्हणजे अरामापासून सुटण्याचे चिन्ह होय; तू अफेक येथे अराम्यांना असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल.” त्याने त्याला म्हटले, “बाण उचलून घे.” त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “जमिनीवर बाण मार.” तो तीनदा मारून थांबला. देवाचा माणूस त्याच्यावर रागावून म्हणाला, “तू पाचसहा वेळा बाण मारायचे असते, म्हणजे अरामाचा क्षय होईपर्यंत तू त्याला मार दिला असतास; आता तू त्याला तीन वेळा मात्र मार देशील.” ह्यानंतर अलीशा मृत्यू पावला, व लोकांनी त्याला मूठमाती दिली. मग नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्याला मूठमाती देत असताना त्यांच्या नजरेला एक टोळी पडली; आणि त्यांनी ते प्रेत अलीशाच्या कबरेत टाकले, तेव्हा अलीशाच्या अस्थींना स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन आपल्या पायांवर उभा राहिला. यहोआहाज ह्याच्या सर्व हयातीत अरामाचा राजा हजाएल ह्याने इस्राएलास त्रस्त केले. तरी परमेश्वराची त्यांच्यावर कृपा होती; देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्राएलावर कृपा होती; त्यांचा त्याला कळवळा होता व त्यांच्यावर त्याची मेहेरनजर होती, म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्यासमोरून त्यांना दूर केले नाही. अरामाचा राजा हजाएल हा मृत्यू पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदाद त्याच्या जागी राजा झाला. बेन-हदाद बिन हजाएल ह्याने यहोआहाज ह्याच्याशी युद्ध करून जी नगरे घेतली होती ती त्याचा पुत्र यहोआश ह्याने परत घेतली. योवाशाने त्याला तीनदा मार देऊन इस्राएली नगरे परत घेतली.