आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गांनी चालला; त्याने बआल दैवतांच्या ओतीव मूर्ती केल्या. त्याने हिम्मोनपुत्राच्या खोर्यात धूप जाळला आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतींना अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पण केली. तो उच्च स्थानी, टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी. म्हणून त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याला अरामी लोकांच्या राजाच्या हाती दिले; त्यांनी त्याला जिंकून त्याचे पुष्कळ लोक पाडाव करून दिमिष्कास नेले. ह्याशिवाय त्याला इस्राएलाच्या राजाच्या हाती दिले; त्याने मोठी कत्तल उडवून त्याला जेर केले. रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने एका दिवसात यहूदातल्या एक लक्ष वीस हजार वीरांचा संहार केला, कारण त्यांनी आपल्या वडिलांचा देव परमेश्वर ह्याला सोडून दिले होते. एफ्राइमातल्या एका जिख्री नामक महावीराने राजपुत्र मासेया, घरकारभारी अज्रीकाम व राजाचा नायक एलकाना ह्यांचा वध केला. इस्राएल लोकांनी आपल्या भाऊबंदांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या मिळून दोन लक्ष माणसे पाडाव करून नेली आणि त्यांना पुष्कळ लुटून ती लूट शोमरोनास नेली. पण ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा तेथे होता; शोमरोनास सैन्य परत आले तेव्हा त्याला मार्गात गाठून तो म्हणाला, “पाहा, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर हा यहूदावर रागावला म्हणून त्याने त्याला तुमच्या हाती दिले; तुम्ही इतक्या क्रोधाने त्यांची कत्तल केली की तो गगनापर्यंत पोहचला आहे. यहूदी व यरुशलेमकर ह्यांना आपले दास व दासी करून ठेवावे असा तुमचा इरादा आहे; तर तुम्हीही आपला देव परमेश्वर ह्याचे अपराधी नाही काय? तर आता माझे ऐका; तुम्ही आपल्या पाडाव केलेल्या भाऊबंदांना परत पाठवून द्या, कारण परमेश्वराचा कोप तुमच्यावर अतिशय भडकला आहे.” तेव्हा एफ्राइमातले कित्येक मुख्य-मुख्य पुरुष म्हणजे अजर्या बिन योहानान बरेख्या बिन मशिल्लेमोथ, यहिज्कीया बिन शल्लूम आणि अमासा बिन हदलाई हे लढाईहून परत येणार्यांना आडवे जाऊन म्हणाले, “ह्या पाडाव केलेल्या लोकांना आत आणू नका; तुम्ही जो संकल्प केला आहे त्याच्यामुळे आम्ही परमेश्वराचे अपराधी होऊ व आमच्या पापांत व दोषात भर पडेल; आमचा दोष तर मोठा आहे आणि इस्राएलावर बहुत कोप भडकला आहे.” तेव्हा त्या हत्यारबंद लोकांनी ते पाडाव केलेले लोक आणि आणलेली लूट ही सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमक्ष सोडून दिली. मग वर नावे सांगितलेल्या पुरुषांनी पाडाव केलेल्या लोकांतल्या उघड्यानागव्यांना लुटीतली वस्त्रे नेसवली, जोडे घालायला दिले, त्यांना खाऊपिऊ घातले, त्यांना तैलाभ्यंग केला आणि सर्व निर्बल लोकांना गाढवांवर बसवून खर्जूर नगर जे यरीहो तेथे त्यांच्या भाऊबंदांकडे पोहचते केले, आणि मग ते शोमरोनास परत गेले.
२ इतिहास 28 वाचा
ऐका २ इतिहास 28
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 28:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ