तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. अजर्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजकपण करीत असलेले ऐंशी वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्यांनी उज्जीया राजाला प्रतिकार करून म्हटले, “हे उज्जीया, परमेश्वराप्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे; अहरोनाचे वंशज जे याजक, ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचेच हे काम आहे. तू पवित्रस्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस; अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.” तेव्हा उज्जीयाला क्रोध आला, धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते; आणि तो याजकांवर संतापला असता, त्यांच्यादेखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. मुख्य याजक अजर्या व दुसरे सर्व याजक ह्यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालवून दिले; परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उज्जीया राजा आमरण कोडी राहिला; तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे; त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले, व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. उज्जीयाची अथपासून इतिपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याने लिहिली आहेत. उज्जीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; तो कोडी होता म्हणून राजांच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मूठमाती दिली; त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला.
२ इतिहास 26 वाचा
ऐका २ इतिहास 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 26:16-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ