YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 26:1-15

२ इतिहास 26:1-15 MARVBSI

उज्जीया1 सोळा वर्षांचा असताना सर्व यहूदी लोकांनी त्याला त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले. अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जीयाने एलोथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले. उज्जीया राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत बावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यखिल्या; ती यरुशलेमेची होती. त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. देवाचे दृष्टान्त जाणणारा जखर्‍या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली. पलिष्टी, गुर-बालवासी अरब व मऊनी ह्यांच्याविरुद्ध देवाने त्याला साहाय्य केले. अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला. उज्जीयाने यरुशलेमेत कोपरावेशीजवळ, खोरेवेशीजवळ आणि कोट वळसा घेतो तेथे बुरूज बांधून त्यांना बळकटी आणली. त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती. उज्जीयाजवळ लढाऊ लोकांचे सैन्य असे; राजाच्या सेनानायकांपैकी एक हनन्या म्हणून होता; त्याच्या हाताखालचा यइएल लेखक व मासेया कारभारी हे गणती करीत, त्यानुसार ते सैन्य टोळीटोळीने लढाईस जात असे. पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूर वीर असत त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती. त्यांच्या अधिकाराखाली तीन लक्ष सात हजार पाचशे एवढी कवायत शिकलेली फौज होती; शत्रूच्या विरुद्ध राजाला कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत. ह्या सर्व सेनेसाठी उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्ये व गोफणगुंडे तयार केले. यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली; त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली; त्याला इतके विलक्षण साहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला.