YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 24:17-27

२ इतिहास 24:17-27 MARVBSI

यहोयादा मरण पावल्यानंतर यहूदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्याला मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती व इतर मूर्ती ह्यांची उपासना करू लागले. ह्या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदावर व यरुशलेमेवर भडकला. तरी त्यांना आपल्याकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले; त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात. मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्‍या ह्याच्या ठायी आला; त्याने उंच जागी उभे राहून लोकांना म्हटले, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघता? अशाने तुम्हांला यश येणार नाही; तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हांला सोडले आहे.”’ मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला. ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.” नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने त्यांच्यावर स्वारी केली; यहूदा व यरुशलेम ह्यांच्यावर चालून येऊन त्यांनी लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला व त्यांचे सर्व धन लुटून दिमिष्काच्या राजाकडे पाठवून दिले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा त्याग केला होता. ह्या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले. ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले, तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरता त्याच्याशी फितुरी करून तो बिछान्यावर पडला असता त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्तानात दिली नाही. ज्यांनी त्याच्याशी फितुरी केली ते हे : शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद1 व मवाबीण शिम्रिथ2 हिचा पुत्र यहोजाबाद. योवाशाचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा व देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ह्यांविषयी सर्वकाही राजांच्या बखरीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याच्या जागी त्याचा पुत्र अमस्या हा राजा झाला.