YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 24:1-16

२ इतिहास 24:1-16 MARVBSI

योवाश राज्य करू लागला तेव्हा तो सात वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव सिब्या; ती बैर-शेबा येथली. यहोयादा याजक ह्याच्या सर्व हयातीत योवाश हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे. यहोयादाने त्याला दोन बायका करून दिल्या; त्याला पुत्र व कन्या झाल्या. ह्यानंतर परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे योवाशाच्या मनात आले; म्हणून त्याने याजक व लेवी ह्यांना एकत्र करून म्हटले, “वर्षानुवर्षे तुमच्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती व्हावी म्हणून तुम्ही यहूदाच्या सर्व नगरांत जा व सर्व इस्राएलांपासून पैसे जमा करा; हे कार्य त्वरित करा;” असे त्याने सांगितले असताही लेव्यांनी ते त्वरेने केले नाही. राजाने त्यांचा नायक यहोयादा ह्याला बोलावून विचारले, “आज्ञापटाच्या तंबूसाठी परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएलाची मंडळी ह्यांनी वहिवाट लावून दिल्याप्रमाणे यहूदा आणि यरुशलेम ह्यांतल्या लोकांपासून लेव्यांना कर जमा करण्यास का सांगितले नाही?” त्या दुष्ट अथल्येच्या पुत्रांनी देवाचे मंदिर मोडूनतोडून टाकले होते आणि परमेश्वराच्या मंदिरातील सगळ्या समर्पित वस्तू त्यांनी बआलदैवतांना वाहिल्या होत्या. राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर ठेवली. मग संबंध यहूदा व यरुशलेमेत असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे ह्याने रानात इस्राएलांवर जो कर बसवला होता तो परमेश्वराप्रीत्यर्थ लोकांनी आणावा. तेव्हा सर्व सरदार व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकत गेले. लेव्यांच्या हातून राजाच्या प्रधानाकडे ती पेटी पोचती होई व तिच्यात बराच पैसा आहे असे त्यांच्या नजरेस पडले म्हणजे राजाचा चिटणीस व मुख्य याजकांचा नायक हे येऊन ती पेटी रिकामी करीत, मग ती परत जागच्या जागी नेऊन ठेवत. त्यांनी दिवसेंदिवस असे करून पुष्कळ पैसा जमवला. मग राजाने व यहोयादाने तो पैसा परमेश्वराच्या मंदिराचे काम करण्यास दिला व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रोजाने गवंडी व सुतार लावले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोखंडी व पितळी काम करणार्‍या कारागिरांना कामास लावले. ह्या प्रकारे कारागिरांनी कामास लागून ते पुरे केले; त्यांनी देवाचे मंदिर नीटनेटके करून त्याला मजबुती आणली. ते सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजाला व यहोयादाला दिले; परमेश्वराच्या मंदिरा-प्रीत्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्यारुप्याची इतर पात्रे बनवली. यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पण करीत असत. पुढे यहोयादा वृद्ध व पूर्ण वयाचा होऊन मृत्यू पावला; तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे वय एकशे तीस वर्षांचे होते. त्याला दावीदपुरात राजांमध्ये मूठमाती देण्यात आली. कारण त्याने इस्राएलात देव व त्याचे मंदिर ह्यांच्यासंबंधाने चांगले काम केले होते.