YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 18:2-34

२ इतिहास 18:2-34 MARVBSI

काही वर्षे लोटल्यावर तो शोमरोन येथे अहाबाच्या भेटीस गेला. त्या प्रसंगी अहाबाने त्याच्यासाठी व त्याच्याबरोबरच्या लोकांसाठी पुष्कळ मेंढरे व बैल कापले आणि आपल्याबरोबर रामोथ-गिलादावर चढाई करण्यास त्याने त्याला प्रवृत्त केले. यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला इस्राएलाचा राजा अहाब म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपले लोक; आम्ही आपल्याबरोबर लढाईस येऊ.” यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश घ्या.” इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “आम्ही रामोथ-गिलादावर चढाई करून जावे की न जावे?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जावे; देव ते राजाच्या हाती देईल.” तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्यांच्याखेरीज परमेश्वराचा दुसरा कोणी संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्‍न विचारू.” इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “राजाने असे बोलू नये.” तेव्हा इस्राएलाच्या राजाने एका कारभार्‍यास बोलावून सांगितले, “लवकर जाऊन इम्लाचा पुत्र मीखाया ह्याला घेऊन ये.” इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते. तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”’ सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणे भाषण करू लागून म्हणाले, “रामोथ-गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो; कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.” जो जासूद मीखायाला बोलावण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे एका विचाराचे होऊन राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, म्हणून त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.” मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ माझा देव जे काही सांगेल तेच मी बोलेन.” तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हे मीखाया, आम्ही रामोथ-गिलादाशी युद्ध करायला जावे की न जावे?” त्याने त्याला म्हटले, “जा, यशस्वी हो; ते तुमच्या हाती लागतील.” राजा त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या नामाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे?” मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल मेंढपाळावाचून मेंढरांसारखे डोंगरावर विखुरले आहेत असे मला दिसले. तेव्हा परमेश्वर म्हणाला, ‘ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”’ इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “हा माझ्यासंबंधाने अनुकूल संदेश न सांगता प्रतिकूल सांगेल असे मी तुला सांगितले नाही काय?” मीखाया म्हणाला, “तर आता तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झाला आहे व त्याच्या उजवीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले. परमेश्वर म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा अहाब ह्याला कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले. त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’ परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील, जा तुझ्याकडून हे होईल; तसेच कर,’ तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.” तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलण्यास कोठून गेला?” मीखाया त्याला म्हणाला, “पाहा, तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.” मग इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश ह्यांच्याकडे माघारी घेऊन जा; आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ‘ह्या माणसाला बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”’ मीखाया म्हणाला, “तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्या द्वारे बोललाच नाही.” तो म्हणाला, “लोकहो, तुम्ही सर्व हे ऐका.” नंतर इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट ह्यांनी रामोथ-गिलादावर चढाई केली. इस्राएलाच्या राजाने यहोशाफाटास सांगितले, “मी वेष बदलून लढाईस जाणार; पण तू आपली स्वतःची वस्त्रे घाल. ह्याप्रमाणे इस्राएलाचा राजा वेष बदलून लढाईस गेला. अरामाच्या राजाने रथांवरील आपल्या सरदारांना आज्ञा केली होती की, “लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.” रथांवरील त्या सरदारांनी यहोशाफाटास पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हाच इस्राएलाचा राजा असावा; म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; पण यहोशाफाटाने आरोळी ठोकली तेव्हा परमेश्वराने त्याला साहाय्य केले. देवाने त्यांना त्याच्याकडून निघून जाण्यास प्रवृत्त केले. रथांवरील सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पिच्छा सोडून ते परतले. मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला; तेव्हा तो आपल्या सारथ्यास म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याबाहेर घेऊन जा.” त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून संध्याकाळपर्यंत उभा राहिला होता; सूर्यास्तसमयी त्याचा प्राण गेला.