बंधूंनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हा स्वत:ला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हांला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करतच आहात. बंधुजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा; आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसांत शांतीने राहा. बंधूंनो, आम्ही तुम्हांला बोध करतो की, अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा. सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका; संदेशांचा धिक्कार करू नका; सर्व गोष्टींची पारख करा; चांगले ते बळकट धरा; वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे; तो हे करीलच. बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा. पवित्र चुंबनाने सर्व बंधुवर्गाला सलाम करा. मी तुम्हांला प्रभूच्या नावाने निक्षून सांगतो की, हे पत्र सर्व पवित्र बंधूंना वाचून दाखवण्यात यावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो.
1 थेस्सल 5 वाचा
ऐका 1 थेस्सल 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 थेस्सल 5:1-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ