शमुवेल बाळ एलीसमक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते; त्याचे दृष्टान्त वारंवार होत नसत.
त्या वेळी एकदा असे झाले की एली आपल्या ठिकाणी निजला होता, (त्याची दृष्टी मंद होऊ लागली होती म्हणून त्याला दिसत नव्हते,) देवाचा दीप अजून मालवला नव्हता, आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता.
तेव्हा परमेश्वराने शमुवेलास हाक मारली; तो म्हणाला, “काय आज्ञा?”
मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” तो म्हणाला, “मी हाक मारली नाही; परत जाऊन नीज.” त्यावरून तो परत जाऊन निजला.
पुन्हा परमेश्वराने “शमुवेला, शमुवेला,” अशी हाक मारली, तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली!” तो म्हणाला, “मुला, मी तुला हाक मारली नाही; परत जाऊन नीज.”
अद्यापि शमुवेलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती, आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रगट झाले नव्हते.
परमेश्वराने शमुवेलास तिसर्यांदा हाक मारली, तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” परमेश्वर त्या बालकाला हाक मारत आहे असे एली आता समजला.
तेव्हा एली शमुवेलास म्हणाला, “जाऊन नीज, आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल जाऊन आपल्या जागी निजला.
तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे “शमुवेला, शमुवेला” अशी त्याने हाक मारली, तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल, तुझा दास ऐकत आहे.”