YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 25:23-44

१ शमुवेल 25:23-44 MARVBSI

अबीगईल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले. ती त्याच्या पाया पडून म्हणाली, “अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या; आपल्या दासीचे बोलणे ऐका. माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काहीएक मनात आणू नये; तो आपल्या नावासारखाच आहे; त्याचे नाव नाबाल (मूर्ख) असे आहे, आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे; ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामींनी पाठवले होते त्यांना मी पाहिले नाही. तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो. मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी. आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा; कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसवील; कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत; आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठायी कसलेही अनिष्ट आढळणार नाही. एक मनुष्य आपला पाठलाग करायला व आपला प्राण घ्यायला उठला आहे, तरी माझ्या स्वामींचा प्राण आपला देव परमेश्वर ह्याच्याजवळ जिवंताच्या समूहात बांधलेला राहील, आणि आपल्या शत्रूंचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफणून टाकील. आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे त्यानुसार माझ्या स्वामींचे कल्याण करून आपणाला परमेश्वराने इस्राएलाचा अधिपती नेमल्यावर, आपण विनाकारण रक्तपात केल्याचा किंवा कोणाचा सूड उगवल्याचा आपणाला पस्तावा होणार नाही; किंवा माझ्या स्वामींच्या मनाला खेद होणार नाही; तर परमेश्वर माझ्या स्वामींचे कल्याण करील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.” दावीद अबीगईलेस म्हणाला, “ज्याने तुला आज माझ्या भेटीसाठी पाठवले तो इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वत: धन्य! तू आज मला माझ्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहेस, वस्तुतः इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरले आहे; त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटायला आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबालाचा एक पुरुषही जिवंत राहिला नसता.” नंतर तिने जे काही आणले होते त्याचा स्वीकार करून दावीद तिला म्हणाला, “आपल्या घरी सुखाने जा; पाहा, मी तुझा शब्द ऐकला आहे व तुझी विनंती मान्य केली आहे.” मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही. सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने ह्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या; तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला. नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला की तो मृत्यू पावला. नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, “नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली तिची दाद ज्याने घेतली आणि आपल्या दासाला घात करण्यापासून आवरले, तो परमेश्वर धन्य! परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्याच शिरी उलटवले.” मग दाविदाने अबीगईलेशी लग्नाचे बोलणे करण्यासाठी तिच्याकडे लोक पाठवले. दाविदाचे चाकर कर्मेल येथे अबीगईलेकडे येऊन तिला म्हणाले, “तुला आपली स्त्री करण्यासाठी घेऊन यावे म्हणून दाविदाने तुझ्याकडे आम्हांला पाठवले आहे.” ती उठून भूमीपर्यंत लवून म्हणाली की, “आपली दासी माझ्या स्वामींच्या दासांचे चरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे.” मग अबीगईल तातडीने उठून गाढवावर बसली; तिच्या पाच सख्या तिच्याबरोबर गेल्या; ती दाविदाच्या जासूदांमागून जाऊन त्याची स्त्री झाली. दाविदाने इज्रेलीण अहीनवाम, हीही एक बायको केली; अशा ह्या दोघी त्याच्या स्त्रिया झाल्या. शौलाने आपली कन्या मीखल, जी दाविदाची स्त्री होती, तिला गल्लीमवासी लइशाचा पुत्र पालती ह्याला देऊन टाकले होते.