YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 25:1-22

१ शमुवेल 25:1-22 MARVBSI

पुढे शमुवेल मृत्यू पावला; तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून शोक केला आणि रामा येथील त्याच्या घरात त्याला मूठमाती दिली. इकडे दावीद निघून पारान नावाच्या अरण्यात गेला. मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे; तो माणूस मोठा मातबर असून त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्‍या होत्या; तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता. त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबीगईल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती; परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेब वंशातला होता. नाबाल आपल्या मेंढरांची लोकर कातरत असल्याचे दाविदाने अरण्यात ऐकले. तेव्हा दाविदाने दहा तरुण पुरुषांना तेथे पाठवले; त्याने त्या तरुणांना सांगितले की, “कर्मेल येथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा. त्या सुखसंपन्न पुरुषाला म्हणा की, ‘आपले आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो. मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावले आहेत; आपले धनगर आमच्यामध्ये होते; आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही, आणि ते कर्मेलात असताना त्यांची काहीएक हानी झाली नाही. आपल्या चाकरांना विचारा म्हणजे ते आपणाला सांगतील; तर ह्या तरुण पुरुषांवर कृपादृष्टी करा; आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना व आपला पुत्र दावीद ह्याला द्या.”’ दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालाला हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले. नाबालाने दाविदाच्या सेवकांना म्हटले, “दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात. माझे अन्न, माझे पाणी आणि माझ्या कातरणार्‍यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण, कोठले, हे मला ठाऊक नाही असल्या लोकांना मी देऊ काय?” तेव्हा दाविदाच्या तरुण पुरुषांनी आल्या वाटेने माघारे जाऊन हे सर्व शब्द जसेच्या तसे दाविदाला सांगितले. तेव्हा दावीद आपल्या लोकांना म्हणाला, “आपल्या तलवारी आपल्या कंबरांना बांधा;” आणि त्या प्रत्येकाने आपापली तलवार आपापल्या कंबरेला बांधली; दाविदानेही आपली तलवार कंबरेला बांधली; दाविदाबरोबर चारशे पुरुष गेले, आणि दोनशे पुरुष सामानसुमानाजवळ राहिले. इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबीगईल हिला सांगितले की, “दाविदाने रानातून आमच्या स्वामींचे क्षेमकुशल विचारण्यासाठी जासूद पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला. हे लोक आमच्याशी चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांचे-आमचे दळणवळण होते; त्या वेळी त्यांनी आम्हांला काही उपद्रव केला नाही व आमची काही हानी झाली नाही. आम्ही त्यांच्याबरोबर शेरडेमेंढरे राखत होतो तोवर ते रात्रंदिवस आम्हांला तटबंदीसारखे होते. तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर; कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.” तेव्हा अबीगईल हिने त्वरेने दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे हुरडा, खिसमिसांचे शंभर घड आणि अंजिराच्या दोनशे ढेपा हे सर्व घेऊन गाढवांवर लादले. ती आपल्या चाकरांना म्हणाली, “तुम्ही पुढे चला, मी तुमच्यामागून येते.” ह्याविषयी तिने आपला नवरा नाबाल ह्याला काही सांगितले नाही. ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते ते तिला भेटले. दावीद म्हणाला होता की, “मी रानात ह्या मनुष्याच्या मालमत्तेचे रक्षण करून त्याची काहीएक हानी होऊ दिली नाही ते खरोखर व्यर्थ गेले; त्याने उपकाराबद्दल अपकार केला; तर सकाळी उजाडेपर्यंत त्याच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही; परमेश्वर माझ्या सर्व शत्रूंचे असेच व ह्याहूनही अधिक वाईट करो.”