YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 8:1-21

१ राजे 8:1-21 MARVBSI

मग शलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरातून म्हणजे सीयोनातून वरती आणण्यासाठी इस्राएलाचे वडील जन, वंशांचे सर्व प्रमुख व सर्व पितृकुळांचे सरदार ह्यांना शलमोन राजाकडे यरुशलेमेत जमा केले. सर्व इस्राएल पुरुष एथानीम महिन्यात म्हणजे सातव्या महिन्यातल्या सणाच्या दिवसांत शलमोन राजाजवळ जमा झाले. इस्राएल लोकांचे सर्व वडील जन आले तेव्हा याजकांनी कोश उचलून घेतला. परमेश्वराचा कोश, दर्शनमंडप आणि त्या मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही सर्व याजक व लेवी ह्यांनी वरती वाहून नेली. शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांच्या संख्येची मोजदाद करता आली नाही. मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभार्‍यात, परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला. कोशाच्या जागेवर करूबांचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांच्यावर त्यांचे आच्छादन होते; त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके गाभार्‍या-समोरल्या पवित्रस्थानातून दिसत; परंतु पवित्रस्थानाबाहेरून ती दिसत नसत; ते दांडे आजपर्यंत तेथेच आहेत. इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबात मोशेने ह्या कोशात दोन दगडी पाट्या ठेवल्या होत्या; त्यांखेरीज त्यात दुसरे काही नव्हते. याजक पवित्रस्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. मग शलमोन राजा म्हणाला, “परमेश्वराने म्हटले आहे की मी निबिड अंधकारात वस्ती करीन. तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.” मग राजाने मागे वळून इस्राएलाच्या सर्व मंडळीला आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली. तो म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर धन्य! त्याने माझा बाप दावीद ह्याला स्वमुखाने हे वचन दिले होते व त्याने स्वहस्ते हे पूर्ण केले; ते वचन असे : मी आपल्या इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्राएल वंशाकडून मी कोणतेही नगर निवडून घेतले नाही, पण माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर दाविदाला मी निवडून नेमले आहे. माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे. पण परमेश्वराने माझा बाप दावीद ह्याला सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहेस हे तू चांगले केले आहेस; पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. परमेश्वर जे हे वचन बोलला ते त्याने पुरे केले; मी आपला बाप दावीद ह्याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्राएलाच्या गादीवर बसलो आहे; आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मी हे मंदिर बांधले आहे. परमेश्वराने आमचे वाडवडील मिसर देशातून आणले तेव्हा त्यांच्याशी परमेश्वराचा जो करार झाला तो त्या कोशात आहे; त्यासाठी मी स्थान तयार केले आहे.”