१ राजे 10:1-9
१ राजे 10:1-9 MARVBSI
परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहायला आली. ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली. ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत. आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत. ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”

