YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 5:1-12

1 योहान 5:1-12 MARVBSI

येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. [कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत : पिता, शब्द आणि पवित्र आत्मा आणि हे तिघे एक आहेत.] पृथ्वीवर साक्ष देणारे तिघे आहेत : आत्मा, पाणी व रक्त; ह्या तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे; जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे; ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे; कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे; ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.