आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हांला मानावे. कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला काहीच वाटत नाही, मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही. कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. बंधुजनहो, मी तुमच्याकरता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुल्लोसाला लागू केल्या आहेत; ह्यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आमच्यापासून शिकावा म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकासाठी दुसर्यावर फुगणार नाही. तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस? तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. कारण मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहोत! आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत; आम्ही ठोसे खात आहोत, आम्हांला घरदार नाही. आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो; आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो; आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत. तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल. मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन; तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही, पण सामर्थ्यात आहे. तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
१ करिंथ 4 वाचा
ऐका १ करिंथ 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 4:1-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ