YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 3:9-23

१ करिंथ 3:9-23 MARVBSI

कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला; आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो, तर बांधणार्‍या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये; ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे. आणि “ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो,” असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे; पौल असो, अपुल्लोस असो, अथवा केफा असो, जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.