YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 15:12-58

१ करिंथ 15:12-58 MARVBSI

आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही; आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो; कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले; पण मेलेले उठवलेच जात नाहीत तर मग त्याने त्याला उठवले नाही. कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही; आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्ही अजून आपल्या पापांतच आहात. आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्‍यांतले प्रथमफळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील; पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल. कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. कारण “त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.” परंतु “सर्व अंकित केले आहे” असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे. त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.1 असे नसल्यास मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत तर त्यांच्याखातर ते बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घालतो? बंधुजनहो, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्या ठायी मला तुमच्याविषयी जो अभिमान आहे त्याला स्मरून मी प्रतिज्ञेवर सांगतो की, मी रोज रोज मरतो. मनुष्यस्वभावाप्रमाणे म्हणायचे तर इफिसात मी श्वापदांबरोबर लढाई केली ह्यात मला काय लाभ? मेलेले उठवले जात नाहीत, “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरायचे आहे.” फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.” नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो. आता कोणी म्हणेल, “मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात?” हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही; आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसर्‍या कशाचा असेल; पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. तो बीजातल्या प्रत्येकाला त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाहीत; तर माणसांचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, तार्‍यांचे तेज निराळे; कारण तार्‍यातार्‍यांच्या तेजांत भेद आहे. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते; जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते; प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहेत. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे; परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2