Logo de YouVersion
Ícono Búsqueda

फिलि. 4

4
सदबोध
1म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
2मी युवदीयेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकमनाचे व्हा. 3आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या पण मी तुलाही विनवितो की, तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.
4प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा. 5सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. 6कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; 7म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
8बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. 9माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.
फिलिप्पैकरांनी दाखविलेल्या ममताळूपणाबद्दल पौलाची कृतज्ञता
10मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती. 11मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. 12दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. 13आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.
14पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. 15फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. 16मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्‍यांदाही माझी गरज भागविली. 17मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. 18पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. 19माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील. 20आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
समारोप
21ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. 22सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात.
23प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.

Actualmente seleccionado:

फिलि. 4: IRVMar

Destacar

Copiar

Comparar

Compartir

None

¿Quieres guardar tus resaltados en todos tus dispositivos? Regístrate o Inicia sesión