Logo de YouVersion
Ícono Búsqueda

कल. 4

4
1धन्यांनो, तुम्हांसही स्वर्गात धनी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व समतेने वागा.
प्रार्थना व रोजची वागणूक
2प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा. 3आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे. 4म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे.
5बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. 6तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
नमस्कार व समाप्ती
7माझा प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्यासोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळवील. 8मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की, म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. 9मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम, जो तुमच्यांतलाच आहे त्यालाही पाठवले आहे; ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील.
10माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.) 11युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हास सलाम सांगतो; सुंता झालेल्यांपैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. 12ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे रहावे. 13तुम्हासाठी व जे लावदीकियात व हेरापलीत आहेत त्याच्यांसाठी तो फार श्रम करीत आहे, अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो. 14प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. 15लावदीकियातील बंधू आणि नुंफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम द्या. 16हे पत्र तुमच्यांत वाचून झाल्यावर की, लावदीकियातील मंडळीतही वाचले जावे आणि लावदीकियाकडील पत्र तुम्हीही वाचावे. 17अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.
18मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.

Actualmente seleccionado:

कल. 4: IRVMar

Destacar

Copiar

Comparar

Compartir

None

¿Quieres guardar tus resaltados en todos tus dispositivos? Regístrate o Inicia sesión