1 तीम. 1
1
नमस्कार व खोटया शिक्षणासंबंधाने इशारा
1देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून: 2विश्वासातील माझे खरे मूल तीमथ्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा, दया आणि शांती असो.
3मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये. 4आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो. 5आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी. 6या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. 7त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
8परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे. 9आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक 10जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे. 11गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
ख्रिस्तकृपेबद्दल पौलाने दाखवलेली कृतज्ञता
12ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. 13जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली. 14परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली. 15ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. 16परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे.
17आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.
18तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी. 19आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले. 20त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.
Actualmente seleccionado:
1 तीम. 1: IRVMar
Destacar
Copiar
Comparar
Compartir
¿Quieres guardar tus resaltados en todos tus dispositivos? Regístrate o Inicia sesión
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.