निर्गम 10
10
टोळाची पीडा
1मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे 2व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.”
3मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील. 4तू जर त्यांना जाऊ दिले नाहीस, तर उद्या मी तुझ्या संपूर्ण देशावर टोळ आणेन. 5ते तुझी भूमी आच्छादून टाकतील की, जमीन मुळीच दिसणार नाही, शेतात असलेल्या झाडांसह, गारांच्या व पावसाच्या मारातून जे पीक वाचले आहे त्याचा ते नाश करतील, एवढेच नव्हे तर वनात वाढणारी झाडेही ते खाऊन टाकतील. 6ते तुझी घरे व तुझ्या अधिकार्यांची व सर्व इजिप्तच्या लोकांची घरे भरून टाकतील; इजिप्तच्या इतिहासात तुझे वडील व तुझे पूर्वज या देशाचे रहिवासी झाले तेव्हापासून आजपर्यंत असे झालेले त्यांनी कधी पाहिले नाही.’ ” मग मोशे वळून फारोहपासून निघून गेला.
7फारोहचे अधिकारी त्याला म्हणाले, “किती काळ हा मनुष्य आम्हाला पाश म्हणून असणार? याहवेह त्यांचा परमेश्वर यांची उपासना करावी म्हणून या लोकांना जाऊ द्या. इजिप्तचा नाश झाला आहे याची तुम्हाला जाणीव नाही काय?”
8मग मोशे व अहरोन यांना फारोहकडे पुन्हा बोलाविण्यात आले. फारोह त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचा परमेश्वर याची उपासना करावी म्हणून तुम्ही जा, पण कोण कोण जाणार हे मला सांग.”
9मोशेने उत्तर दिले “आम्ही आमचे तरुण व वृद्ध, आमचे पुत्र व कन्या आणि आमची शेरडेमेंढरे व गुरे या सर्वांसह जाणार. कारण आम्ही सर्वांनीच याहवेहचा सण साजरा करणे आवश्यक आहे.”
10तेव्हा फारोह त्यांना म्हणाला, “मी तुमच्या मुलाबाळांस व स्त्रियांना जाऊ दिले तर याहवेह तुम्हाबरोबर असो! खचितच तुम्ही दुष्टता योजली आहे.#10:10 किंवा सावध राहा, तुमच्यापुढे संकट आहे 11नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले.
12मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू आपला हात इजिप्त देशावर लांब कर म्हणजे टोळधाड येईल व गारांच्या वर्षावातून वाचलेली वनस्पती जी भूमीवर वाढत आहे त्या सर्वांचा ती नाश करेल.”
13तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्याने टोळ आणले. 14त्यांनी संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला व ते मोठ्या संख्येने देशाच्या प्रत्येक भागात जाऊन राहिले. इतिहासात अशी भयंकर टोळांची पीडा ना कधी आली होती ना पुढे कधी येणार. 15कारण टोळांनी जमिनीचा पृष्ठभाग अगदी काळा होईपर्यंत झाकून टाकला व गारातून जे वाचले होते ते सर्वकाही—शेतातील सर्व पीक व झाडावरील प्रत्येक फळ त्यांनी फस्त केले. संपूर्ण इजिप्त देशात ना झाडे ना वनस्पती, काहीही हिरवे असे राहिले नाही.
16मग फारोहने मोशे व अहरोन यांना त्वरेने बोलावून घेतले आणि म्हटले, “मी तुमच्या याहवेह परमेश्वराविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 17परत एकदा माझ्या पापाची मला क्षमा करा आणि तुमच्या याहवेह परमेश्वराने ही पीडा माझ्यापासून दूर करावी म्हणून त्यांच्याकडे विनंती करा.”
18मग मोशे फारोह पुढून निघून गेला व त्याने याहवेहकडे प्रार्थना केली; 19आणि याहवेहने पश्चिमेच्या दिशेने वार्याची दिशा बदलली व त्या वार्याने टोळांना एकवटून तांबड्या समुद्रात#10:19 किंवा लव्हाळ्याचा समुद्र टाकले. इजिप्तमध्ये एकही टोळ शिल्लक राहिला नाही. 20पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.
अंधकाराची पीडा
21नंतर याहवेहने मोशेला म्हटले, “तू आपला हात वर आकाशाकडे लांब कर, म्हणजे इजिप्त देशावर अंधार पडेल—इतका अंधार की त्याला लोक चाचपडतील.” 22तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे लांब केला, आणि तीन दिवसांसाठी निबिड अंधकाराने संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला. 23कोणी कोणाला पाहू शकत नव्हते व तीन दिवस कोणी आपल्या ठिकाणाहून हलला नाही, परंतु जिथे इस्राएली लोक राहत होते तिथे मात्र प्रकाश होता.
24तेव्हा फारोहने मोशेला बोलावून घेतले. तो म्हणाला, “जा, आणि याहवेहची उपासना करा. तुमच्या स्त्रिया व लेकरे सुद्धा तुमच्याबरोबर जाऊ शकतात; तुमची जनावरे व शेरडेमेंढरे मात्र सोडून जा.”
25परंतु मोशे म्हणाला, “याहवेह, आमचा परमेश्वर यास आम्ही यज्ञ व होमबली अर्पण करावे म्हणून जाऊ दे. 26आमची जनावरे सुद्धा आमच्याबरोबर गेली पाहिजेत; एक खूर देखील आम्ही मागे ठेवणार नाही. आम्हाला त्यांच्यापैकी काहींचा याहवेह आमचे परमेश्वर यांची उपासना करण्यास वापर करावयाचा आहे, आणि त्यात आम्ही काय वापरावे हे आम्ही त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आम्हाला समजणार नाही.”
27पण याहवेहने फारोहचे हृदय कठीण केले, व तो त्यांना जाऊ देण्यास मान्यता देईना. 28फारोह मोशेला म्हणाला, “माझ्यासमोरून चालता हो! आपले तोंडसुध्दा मला पुन्हा दाखवू नकोस! ज्या दिवशी तू माझे तोंड पाहशील त्या दिवशी तू मरशील.”
29“तू म्हणालास तसेच होईल,” मोशे म्हणाला. “मी पुन्हा तुझ्यासमोर उभा राहणार नाही.”
Valgt i Øjeblikket:
निर्गम 10: MRCV
Markering
Kopiér
Sammenlign
Del
Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.